Skip to main content

सख्या भावाने भावाला व भावजयीला मिरची पूड टाकून केली मारहाण उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद









उदगीर तालुक्यातील मौजे लोणी येथे बंद पडलेला बोअर दुरुस्ती करण्यासाठी आलेला खर्च देण्याच्या कारणावरून डोळ्यात मिरचीची पूड टाकून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरील मारहाण प्रकरणी आशा प्रभू केंद्रे (रा. लोणी ता.उदगीर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ते शेतात राहतात. या शेतात तिघा भावांमध्ये सामाईक बोअर असून तो बंद पडला होता. सदरील बोअर दुरुस्त करुन घेण्यात आला. त्यासाठी लागणारा खर्च राम भाऊराव केंद्रे यांना फिर्यादीचा पुतण्या महादेव बालाजी केंद्रे व फिर्यादीचा नवरा प्रभू केंद्रे यांनी 5 मार्च रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मागितले होते. मात्र शिवीगाळ करून राम भाऊराव केंद्रे, त्यांचा मुलगा विकास राम केंद्रे, आकाश राम केंद्रे यांनी पुतण्या महादेव, जाऊ गोदावरी आणि फिर्यादीचा नवरा प्रभू यांना मारहाण केली. त्यामुळे महादेव केंद्रे याने मारहाणीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती.


त्याचा राग मनात धरून रात्री साडे नऊ वाजता राम भाऊराव केंद्रे, विकास राम केंद्रे, आकाश राम केंद्रे यांनी फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादी व त्यांचा नवरा प्रभु केंद्रे यांच्या अंगावर मिरचीची पूड टाकून लाकडाने मारहाण केली. आरडाओरडा ऐकून भांडण सोडवण्यासाठी पुतण्या महादेव, जाऊ गोदावरी, सासू सूर्यकांता, दीर बालाजी हे आले असता त्यांच्याही अंगावर मिरचीची पूड टाकून शिवीगाळ करून त्यांना मारहाण करण्यात आली. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 बातमी आवडत असतील तर कमेंट मध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा