लातूर / कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील कुटुंब पसार; अधिकाऱ्यांची लातूर, उस्मानाबादेत धावपळमोबाईल लोकेशनवरून घेतला शोध, लातूर जिल्ह्यातल्या गुंफावाडी परिसरात सापडले कुटुंबाला ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्याच घरी निगराणीखाली ठेवले
लातूर -पुण्यातील एका कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात असलेल्या तिघांनी तेथून (पुणे) पलायन करून प्रारंभी कळंब आणि नंतर लातूर गाठल्याच्या सूचना मिळाल्यामुळे गुरुवारी सायंकाळपासून रात्री ११ वाजेपर्यंत उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील प्रशासन, पोलिस आणि आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. अखेर लातूर पोलिसांनी या तिघांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या चौघांना गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे त्यांच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी काढून त्यांना शुक्रवारी सकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र त्यांना त्यांच्याच घरात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
दुबईहून पुण्यात आलेल्या एका कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे कळाल्यानंतर त्यांच्या घरी काम करणाऱ्या कुटुंबातील तिघांनी कोणालाही कल्पना न देता तेथून पळ काढला आणि कळंब तालुक्यातील मूळ गावी परतले. हा प्रकार समजताच पुणे जिल्हा प्रशासनाने प्रारंभी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाला याची कल्पना देऊन सजग केले. गुरुवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत कळंब उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी त्या कुटुंबांच्या मूळ गावात जाऊन त्यांचा शोध घेतला. परंतु ते आढळून आले नाहीत. त्यांचे मोबाइल लोकेशन शोधल्यानंतर ते लातूर जिल्ह्यातल्या गुंफावाडी परिसरात असल्याचे दिसून आले. याची माहिती लातूर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली. उपाधीक्षक सचिन सांगळे आपल्या सहकारी आणि आरोग्य विभागाच्या पथकासह गुंफावाडी परिसरात जाऊन चौकशी करून त्या कुटुंबीयांना गाठले. सर्व अधिकाऱ्यांनी चेहऱ्यावर मास्क घालूनच त्यांची चौकशी केली आणि पुण्याहून परतलेले तिघे आणि त्यांच्या संपर्कात आलेले चौघे नातेवाईक अशा सात जणांना गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या कोरोना कक्षात दाखल करण्यात आले. त्यामध्ये तीन महिला, एक पुरुष व दोन मुलांचा समावेश आहे. या सात जणांवर उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या घशातील स्रावाचे (स्वॅब) नमुने काढून ते रात्रीच पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र या सातही जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. त्यामुळे त्यांना रात्रभर निगराणीखाली ठेवून शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गुंफावाडी येथील घरी पाठवण्यात आले आहे.